आपली मराठी ?
मराठी भाषेला आपण आपली समजतोय का ? आता तुम्ही म्हणाल हो म्हणजे काय , आम्हाला अभिमान आहे , गर्व आहे आमच्या भाषेचा .खरं आहे , पण हे अर्धवट सत्य आहे . हो , थोडं अधिक स्पष्ट करून सांगते .
जन्म झाला आणि आपल्या कानावर पहिला शब्द मराठी पडला . हळूहळू आपण मराठी बोलायलाही शिकलो . नंतर शाळेत गेलो आणि मराठी , हिंदी , इंग्रजी , संस्कृत अश्या आणखी काही भाषांची ओळख झाली . तुम्ही कधी शाळेत असताना कवितांना चाल लावून त्या म्हणायचात का ? मला हे प्रचंड आवडायचं . नवीन वर्षाची , नवीन इयत्ते ची पुस्तके मिळाली , की पहिल्यांदा सगळ्या कविता वाचून काढायच्या . त्यात काही कवितांना सिनेमातील गाण्याच्या तर काही अगदी वेड्या वाकड्या चाली लावायच्या . वर्गात शिक्षक नसताना बाकावरती ( बेंच ) हाताने वाजवून ( तबला वादकच जणू आम्ही ) त्या कविता म्हणण्याचा आनंद काही निराराच . मला पाचवीच्या बालभारतीच्या पुस्तकातील 'इंद्रजित भालेराव' लिखित 'बाप' कविता खूप आवडते . हो आवडते म्हणतेय , कारण आजही शेतात गेल्यानंतर आपल्या बापाला शेतात काम करताना पाहून "माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा , त्याच्या भाळी लिहिलेला रात दिस कामधंदा ...........आम्ही कष्टाचच खातो जग करी हापाहाप" हे तितक्याच सहजतेने तोंडात येत . हा गोडवा मराठीतच.
हल्ली असं नाही होत . मुलं कॉन्व्हेंट मध्ये शिकत आहेत . शाळेत जाण्याआधी पासून त्यांना घरात apple , ball शिकवलं जातंय . शाळेत इंग्रजी मधेच बोलणं , घरी सुद्धा जाणीवपूर्वक इंग्रजी . मग मला सांगा कशी वाटेल मराठी आपली ? आणि जेव्हा ही लहानगी मुलं " I don't like marathi , it's too hard " असं काहीतरी म्हणतात आणि काहीतरी चुकतंय अस वाटू लागतं .बरं हे इथेच थांबत नाही , पुढे हीच मुलं उच्च शिक्षणाच्या जोरावर परदेशात जातात , आणि आतातर तर हद्दच होते .लाज वाटू लागते याना मराठीची , आपले गावाकडचे तेच मित्र गावठी वाटू लागतात .
मराठी जपली पाहिजे . आपल्या आईचा आदर आपण नाही केला , तर इतरांकडून आपण त्याची अपेक्षा ठेवणं मूर्खपणा ठरेल . इंग्रजी बोलू नका असं नाही , पण जिथे गरज असेल तिथेच . भले इंग्रजी कमवायला शिकवेल , पण कसं जगायचं हे मराठीच शिकवते .
मराठी राजभाषा दिनाच्या मनस्वी शुभेच्छा 🌹
टिप्पण्या